भुसावळ तालुक्यातील दीपनगराजवळ घडली घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- दीपनगर औष्णिक उर्जा प्रकल्पाजवळ मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कारमधील युवकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भुसावळकडून वरणगावकडे निघालेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार चालकाशेजारील हिरामण कारभारी धात्रक (वय ४४, रा. उंबराणे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर नरेंद्र दत्तात्रय मुळे व चालक विजय देवराम कोळी (दोन्ही रा. नाशिक) हे जखमी झाले आहेत. महामार्गावरील बंद असलेल्या निर्मल हॉटेलसमोर हा अपघात झाला असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर प्रकल्पाजवळ मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला. नाशिक जिल्ह्यातील तिघे भुसावळकडून वरणगावच्या दिशेने गुजरात पासिंगच्या कारने निघाल्यानंतर त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास पो.हे.कॉ. योगेश पालवे करत आहेत.