जळगावात काशिनाथ चौकात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील काशीनाथ चौकात रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका भरधाव मालवाहू महिंद्रा पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, अपघात करणारा पिकअप चालक घटनेनंतर अपघातस्थळावरून पसार झाला आहे. याबाबत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाह जाहीद अख्तार अबीद शाह (वय १८, रा. अक्सा नगर, मेहरुण, जळगाव) हे मसाज थेरपिस्टचा व्यवसाय करतात. रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या पत्नीसह मोटारसायकल क्रमांक (एमएच-१९ डीजे-७०५९) ने घरी जात होते. काशीनाथ चौक येथे कुसुंबा गावाकडून अंजिठा चौकाकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक (एमएच २८ बीबी ४१५७) वरील चालकाने अत्यंत भरधाव वेगात येऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. समोरून येणाऱ्या या पिकअप चालकाने शाह जाहोद अख्तार यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत शहा जाहीद आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्त मार लागून दुखापत झाली. अपघातानंतर पिकअपचा चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. त्यानंतर रात्री ११ वाजता पिकअप वाहनावरील अज्ञात चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.









