जळगाव ( प्रतिनिधी ) – बस प्रवासात कार्ड नसतांना अर्धे तिकीट काढून वाहकाला शिवीगाळ व मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रवाशाला दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली तुळशीराम हरलाल राठोड (वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
२१ सप्टेबर २०१८ रोजी तुळशीरामराठोड चाळीसगाव – मालेगाव बसमध्ये (एमएच १९ बीटी १३४२) बसला होता. वाहक महेश चव्हाण यांनी तिकीटासंदर्भात प्रवाशी तुळशीराम राठोडला विचारणा केली असता अर्धे तिकीटासाठी लागणारे एसटी महामंडळाचे किंवा पुरावा म्हणून काहीही नसतांना राठोडने अर्धे तिकीट मागितले. अर्धे तिकीटासाठी लागणारे कार्ड नसल्यामुळे पुर्ण तिकीट काढावे लागेल असे वाहक चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारहाण केली व शिवीगाळ केली. ‘तुझ्याकडून काय होते ते करुन घे’ असे म्हणत धमकी दिली होती. चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राठोडविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात दोषारोप सादर झाल्यानंतर न्या एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षाने ८ साक्षीदार तपासले. युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने तुळशीराम राठोड याला दोषी धरुन दोन वर्ष सक्तमजूरी व दहा हजार रूपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले .