जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेट क्र. १ मधून गंभीर रुग्ण घेऊन येणाऱ्या आपत्कालीन वाहनांना आतमध्ये येण्यास परवानगी आहे. मात्र, काही पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालून गरज नसताना वाहने आत नेत असल्याने अनेकदा रुग्णसेवेत अडथळे येत आहेत. अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांचे रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्याने दुचाकीस्वार वाद घालत असल्याचे रोज पाहायला मिळत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणारे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, अधिकारी यांच्यासाठी गेट क्रमांक २ कडून वाहनतळ बनविण्यात आले आहे. त्यामुळे गेट क्र. १ मधून रुग्णालयात फक्त आपत्कालीन वाहनांनाच येण्यास परवानगी आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वाहनतळ बनविण्याबरोबर सुरक्षारक्षकांना सूचना देत वाहनचालकांना शिस्त बसविली होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून नवीन अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी पदभार घेतल्यानंतर रुग्णालयाकडे पुरेसे लक्षच दिलेले नाही. त्यामुळे बेशिस्त वागणाऱ्यांचे फावत आहे.
सकाळी ओपीडीच्या वेळात गेट क्र. १ मधून आत जाण्यासाठी पोलीस कर्मचारी, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हे सुरक्षारक्षकांशी वाद घालत असतात. सुरक्षारक्षक त्यांना, तुमचे वाहन गेट क्र. २ मध्ये घ्या असे सांगतात. मात्र, त्यांना न जुमानता पोलीस, कार्यकर्ते हे शवविच्छेदन कक्षाच्या दिशेने किंवा अपघात विभागाकडे वाहन पार्किंग करतात. त्यामुळे रुग्णसेवेला अनेकवेळा अडथळा येत आहे.







