हिंगोली ( प्रतिनिधी ) – हिंगोली जिल्ह्यातील एसटी वाहकानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या संबंधित वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी संप सुरु केला आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं ही प्रमुख मागणी आहे. एसटीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर आहेत. राज्य सरकारनं महागाई भत्ता वाढवत संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटीच्या विलिनीकरण या प्रमुख मागणीकडे कुणी लक्ष देत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यातील 59 पेक्षा अधिक आगारांमध्ये सुरु आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने हिंगोलीतील वाहकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश टाळीकुटे अस आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. ते कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात वाहकावर उपचार सुरू आहेत.
एसटी संपाबाबत एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक सुरु आहे. पुण्यातील खराडीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. बैठकीत संपाबाबत पुढील दिशा ठरवली जाणार आहे. एस टी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.
जळगाव आगारातील आज फक्त एसटी बसेस बंद आहेत, उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे.