जामनेर तालुक्यातील पाळधी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी-नाचणखेडा दरम्यान असलेल्या वाघूर नदीत पोहायला गेला असताना बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव सचिन प्रकाश बोरोले (२२, नाचणखेडा) असे आहे. नाचणखेडा पुलाजवळील नदीपात्रामध्ये बांध बांधलेला आहे, त्याठिकाणी काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तीनजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले; परंतु रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण बुडू लागले. मात्र त्यातील दोन जणांना वाचविण्यात यश आले. सचिन बोरोले हा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नदीपात्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. माहिती कळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनचे पो.नि. सचिन सानप, कर्मचारी सत्यवान कोळी व सुभाष पाटील यांनी धाव घेत पंचनामा केला.