रावेर तालुक्यातील वाघोड गावाजवळ घटना
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाघोडजवळील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकलस्वार पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रावेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मनीष मनोहर सोलंकी (वय २४, रा. दुगवाडा, ता. जि. खंडवा) असे मृत युवकाचे नाव आहे. तो सावदा येथे कामासाठी जात असताना हा अपघात झाला. सायंकाळी मनीष सोलंकी आपल्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून सावदा दिशेने जात होता. वाघोडजवळ अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवरून त्याची गाडी असंतुलित झाली आणि तो रस्त्यावर आदळून पडला. अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत. युवकाच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.