निवेदन देऊन प्रशासनाचे वेधले लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : वक्फ संशोधन कायदाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कौमी एकता फाऊंडेशन, फैजपूर यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात या कायद्याला विरोध दर्शवत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कौमी एकता फाऊंडेशनने निवेदनात म्हटले आहे की, वक्फ संशोधन विधेयक २०२४ ला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र विरोध झाला होता. या विधेयकासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात आली होती, ज्याने ३७ बैठका घेतल्या, १० मोठ्या शहरांना भेटी दिल्या आणि २० पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केली. याशिवाय, ९७ लाख २७ हजार ७७२ लोकांनी या संशोधनाविरोधात निवेदने सादर केली. लोकसभेत २३२ आणि राज्यसभेत ९५ खासदारांनी या विधेयकाला विरोध केला. तरीही सरकारने हे विधेयक मंजूर करून त्याला कायद्याचे स्वरूप दिले, ज्याला आता “उम्मीद २०२५” असे संबोधले जाते.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, हा कायदा असंवैधानिक पद्धतीने मंजूर करण्यात आला असून, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात १५ याचिका दाखल झाल्या आहेत. यामुळे राष्ट्रपतींना विनंती करण्यात आली आहे की, ते या कायद्याला रद्द करण्यासाठी अधिसूचना जारी करावी. कौमी एकता फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत त्यांचा विरोध सुरू राहील. यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा आणि रणनीती ठरवण्यासाठी लवकरच बैठका घेतल्या जाणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले. या ठिय्या आंदोलनात कौमी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, सचिव सय्यद जावेद, कलीम खान, जमलोद्दीन, शेख वसीम, जैद पिंजारी, शेख तौफिक, अख्तर पहेलवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते.