चोपडा तालुक्यात वाडकी गावावर शोककळा
चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील वाडकी येथील एका ३५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश राजेंद्र धिवर (वय ३५, रा. वाडकी, ता. चोपडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास, चोपडा शहराच्या पुढे असलेल्या तारामती नगर जवळील शेतखोल रस्त्यालगत एका झाडाला गणेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने औषधोपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गणेश धिवर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी हे करत आहेत. तरुण वयात गणेश यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने वाडकी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








