शासनाच्या १५ व्या वित्त आयोगामधील निधीत अपहार भोवला
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अपहार केल्याचा ठपका असलेले वढोदा येथील ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांना निलंबित करण्याचा आदेश गटविकास अधिकारी यांनी काढला आहे. प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वढोदा ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची तक्रार उपसरपंच रंजना हरिदास कोथळकर व प्रदीप हरिदास कोथळकर यांनी केली होती. सन २०२३-२०२४ मध्ये झालेल्या विकासकामात असल्याचा आरोप त्यांनी १३ मार्च २०२४ व १८ मार्च २०२४ रोजी केलेल्या तक्रारीत केला होता. रस्ता काँक्रिटीकरण, गटार ढापे, एलईडी लाईट, गावतळे खोलीकरण या कामांचे पैसे काम न करता काढण्यात आले. ही कामे आधीच झालेली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने १६ मे २०२४ रोजी तक्रारदारांचे जबाब नोंदविले.
दि. १ एप्रिल २०२३ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत सरपंच स्वप्ना संदीप खिरोडकर यांनी तक्रारदारांचे तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने वारंवार सूचित करून सुद्धा आपला जबाब नोंदविला नाही. दि. १ एप्रिल २०२३ ते ११ जुलै २०२३ दरम्यान नियुक्ती असलेले तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय ए. भिवसने यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली असल्याने त्यांचा जबाब नोंदविता आला नाही. विद्यमान ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांच्या काळात विकासकामांचे मूल्यांकन दाखले, मोजमाप पुस्तिका व काम पूर्णत्वाचे दाखले व इतर संबंधित दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याने तसेच स्थळ पाहणीवेळी कामाचे स्थळ दर्शक नकाशे, बांधकामाचे जिओ टॅग फोटो चौकशी समिती समोर सादर न केल्याने १५ वा वित्त आयोग सन २०२३-२०२४ अंतर्गत केलेल्या कामांबद्दल साशंकता निर्माण होते, असे शाखा अभियंता, बांधकाम विभाग, यांनी लेखी जबाबात नमूद केले होते.
सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर प्रशासकीय व शिस्तभंग कारवाई करण्यात यावी असा अहवाल २३ डिसेंबर २०२४ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. यावरून विजय सातव यांनी १५ वा वित्त आयोगाच्या प्राप्त निधीत खर्च करताना गंभीर स्वरूपाच्या आर्थिक अनियमितता व अपहार केल्याचे नमूद करीत गटविकास अधिकारी यांनी निलंबनाचे आदेश दिले आहे.