भुसावळ (प्रतिनिधी ) – खडका येथे शेजाऱ्यांच्या गच्चीवर वाळत टाकलेले तांदूळ जमा करून लाेखंडी जिन्यावरून उतरताना पाय घसरून पडल्याने बारावीच्या विद्यार्थिनीचा दिवाळीला वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. नेहा सुधाकर काेळी (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे.
खडका येथील सुधाकर काेळी यांची मुलगी नेहा ज्ञानज्याेती विद्या मंदिरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती गुरूवारी सकाळी ती शेतात लाणी करायला गेली हाेती. काम आटाेपून ती घरी परतली. नंतर शेजारी दिलीप पाटील यांच्या गच्चीवर वाळत टाकलेले तांदूळ घेऊन ती लाेखंडी जिन्याने खाली उतरत हाेती. पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडली. हा जीना जमिनीपासून सुमारे २० ते २५ फूट उंच आहे.
जमिनीवर कोसळल्याने नेहाच्या डाेक्याला जबर मार लागला. तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला. मात्र, वेळेवर रिक्षा उपलब्ध झाली नाही. यामुळे जखमी अवस्थेतच तिला दुचाकीवरून डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे दाखल करून न घेता त्याला जळगावला पाठवण्यात आले. दरम्यान रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून सायंकाळी खडका येथे अंत्यसंस्कार झाले.