जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात वाद मिटविण्यास गेलेल्या तरुणावर दोन जणांनी मिळून लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पोंगा फॅक्टरीजवळ घडली असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुमताज शेख यूनूस हे पोंगा फॅक्टरीजवळ वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी त्यांचा भाचा मुस्तफा शेख शरीफ हा आला होता. त्याच सुमारास सल्लू शेख उस्मान याचा त्याच्या एका मित्रासोबत वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी मुस्तफा शेख पुढे गेला असता सल्लू शेख उस्मान याला संताप आला. त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या शोएब शेख यांनी मिळून मुस्तफाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
यानंतर सल्लू शेख उस्मान याने हातातील लोखंडी रॉड मुस्तफा शेख यांच्या डोक्यात फेकून दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर “आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देत दोघे घटनास्थळावरून फरार झाले.
जखमी मुस्तफा यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र कोळी हे करीत आहेत.









