नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – कोरोना प्रादुर्भाव वेगाने होत असला तरी, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसार घेण्यात येतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका लांबणीवर टाकण्यास विरोध केला असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या पाहणी दौऱ्यावर असलेले केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय नेत्यांच्या जंगी जाहीरसभा होत आहेत. या सभांना होणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे भीती व्यक्त होत आहे. मात्र, ‘निवडणुका कधी घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे’, असे स्पष्ट करत कोरोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली होती नंतर उत्तर प्रदेशचा तीन दिवसांचा पाहणी दौरा निश्चित केला होता. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक ४०३ जागा असून राज्यात २०१७ मध्ये ७ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यावेळीही ७-८ टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त आहे. मतदानाची प्रक्रिया जितकी अधिक काळ सुरू राहील तितका कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढू शकतो. इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी आहे.