सर्वाधिक नाशिक, जळगावचे ; पालकमंत्री पदासाठी चढाओढ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत आहे. या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातून एकही आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. तर विजयकुमार गावित यांना डच्चू मिळाला आहे. तर जळगाव, नाशिकला सर्वाधिक ३ मंत्री मिळाले आहे.
धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा येथील भाजपचे जयकुमार रावल यांना संधी मिळाली आहे. त्यांना मागील २०१४-२०१९ च्या काळात मंत्रिपद मिळाले होते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून पुन्हा एकदा भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील मंत्रीपदी कायम राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कायम असून मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल भाईदास पाटील यांना डच्चू मिळाला आहे. तर भाजपने भुसावळ येथील संजय सावकारे यांना संधी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीने डच्चू दिला असून मात्र शिवसेनेने मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आ. दादा भुसे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे या दोघांना मंत्रिपद देऊन काहीसा आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर नंदुरबार यंदा रिक्त राहणार आहे. अडीच वर्षानंतर नंदुरबारला संधी मिळेल का हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात आहे.