प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) :- ‘जैन दर्शन’ आगममध्ये ‘जघन्य’, ‘मध्यम’ आणि ‘उत्कृष्ट’ जीव असे माणसांचे तीन प्रकार सांगण्यात आलेले आहेत. भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळ याचा विचार जो करत नाही तो जघन्य म्हटला जातो. ज्यात करुणा, दया हे भाव असतात ते मध्यम तर दुसऱ्यांना कष्ट, पिडा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणारा, हिंसा न करणारा माणूस ‘उत्कृष्ट’ या श्रेणीत गणला जातो, श्रावक-श्राविकांनी उत्कृष्ट माणूस बनण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, तोच मुक्तीचा असतो असा संदेश श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात दिला.
त्याच प्रमाणे ऋषीदत्ता यांच्या क्रमशः अख्यायिकेच्या पुढील कथेचा भाग देखील सांगण्यात आला. ऋषीदत्ता समोर साक्षात मृत्यु उभा होता, परंतु तिच्या चांगल्या कर्मामुळे ती बचावते. भयंकर जंगलात ती एकटी असते. काय करावे हा प्रश्न तिच्या समोर असतो. आपल्या पित्याकडे जाण्याचा निर्णय ती घेते आणि जंगलातून प्रवासाला निघते. “उपदेश देणे सोपे असते, पण उदाहरण बनने हे फार कठीण असते.” ‘अंतगढ़सूत्र’मध्ये ९० महापुरुषांचे वर्णन असल्याचा संदर्भ मिळतो. त्यापैकी किती जणांनी उपदेश दिले? ते सर्व तर उदाहरणच बनलेले दिसतात. ही गोष्ट समजावून सांगताना खंदकऋषी यांचे उदाहरण सांगण्यात आले. खंदकऋषी ५०० शिष्यांसह आपल्या बहिणीच्या नगराच्या आध्यात्मिक कल्याणाच्या उद्देशाने पोहोचतात. नगर मंत्र्याच्या मनात खंदक ऋषींबद्दल द्वेष असतो. त्यांच्याशी हवा तो व्यवहार करण्यासाठी राजआज्ञा ही तो मिळवितो. त्यांच्या सर्व ४९९ शिष्यांना घाणीत पिळून मारले जाते. ऋषींनी आपला जैन साधू धर्म सोडावा व आपली माफी मागावी असे मंत्र्याचे म्हणणे असते. बालमुनीला खंदकऋषींसमोर घाणीत टाकतो. त्यावेळी ऋषींचा संयम सुटतो. मोक्षाला जाणार तोच शेवटच्या क्षणी संयम सुटल्याने केलेली तप, साधना व्यर्थ ठरली, त्यांना मोक्ष मिळू शकला नाही असे डॉ. हेमप्रभाजी म. सा. यांनी प्रवचनात सांगितले.