जामनेर तालुक्यातील गारखेडा कुटुंबीयांवर आली आपबिती, गुन्हा दाखल
विनोद शालिक पवार (रा. गारखेडे बुद्रुक, ता. जामनेर) यांच्या फिर्यादीनुसार, गणेश माने याने त्यांना २ लाख ७० हजार रुपये दिले होते. त्याचप्रमाणे, गावातील आणखी काही कुटुंबांना ऊसतोडीसाठी पैसे दिले होते. ऊसतोडीसाठी येऊ शकत नाही, तुम्ही दिलेली रक्कम परत करून देईन, असे पवार यांनी माने याला सांगितले होते. दिनांक २१ नोव्हेंबरला माने जामनेर येथे आला व त्याने पवार यांना बारामती येथे गेलेली कुटुंबे घेऊन येऊ, असे सांगून पवार यांना नागुलगाव येथे घेऊन गेला.
दिनांक २७ डिसेंबरला फिर्यादी पवार यांचे वडील गंगापुरी येथील शेतात गेले असता, पवार यांना आलेल्या फोनवरून समजले की, त्यांच्या वडिलांना कुणीतरी चारचाकी वाहनातून नेले आहे. पवार यांना संशय आल्याने त्यांनी माने याला विचारणा केली. यावर माने याने आपला आर्थिक व्यवहार झाला असून, त्याची बोलणी करण्यासाठी मी घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्याने वडिलांशी बोलणे करून दिल्याने पवार हे रक्कम घेऊन नागुलगाव येथे गेले. पवार यांच्या आईने माने याच्याशी संपर्क साधला असता, त्याचा फोन बंद येत होता, शेवटी पवार यांनी मानेविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.