पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – जळगांव जिल्ह्यात सतत वाढत चाललेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून स्वतःची आणि कुटुंबाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून, ही परिस्थिती नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी खबरदारीचे उपाय अवलंबावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यांसारखी घरगुती पेये घ्यावीत. टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, अननस, द्राक्षे यांसारखी पाण्याची मात्रा अधिक असलेली फळे खावीत.
सैलसर, सुती, हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा टॉवेलचा वापर करावा. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
घरात थंड वातावरण राखण्यासाठी पडदे लावावेत, रात्री खिडक्या उघडाव्यात
हवामानाची माहिती www.mausam.imd.gov.in या संकेतस्थळावरून नियमित घ्यावी. जास्त धोका असलेल्या लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि हृदयविकारग्रस्त नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पालकमंत्री पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जनतेने प्रशासनाने सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.