जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिंचोली येथे उसनवारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आठ जणांविरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवलसिंग रतनसिंग पारधी ( वय ५२, रा.चिंचोली) यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक २२ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास चिंचोली येथील नवलसिंग पारधी यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. फुलसिंग काळू चव्हाण, निर्मलाबाई फुलसिंग चव्हाण, विक्की पुंडलिक चव्हाण, रोहन पुंडलिक चव्हाण, पुंडलिक फुलसिंग चव्हाण (सर्व रा. इच्छापूर देवी, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), विलास उत्तम धारराव, सागर काशीनाथ चव्हाण (दोन्ही रा. वराडसिम, ता. भुसावळ) आणि करण विजय पारधी (रा. चिंचोली) या आठ जणांनी संगनमत करून नवलसिंग यांना उसनवारीच्या पैशांच्या कारणावरुन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुंडलिक चव्हाण याने नवलसिंग यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली.
तर रोहन चव्हाण याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हाताला मारून जखमी केले. मारहाण करताना आरोपींनी नवलसिंग पारधी यांना जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.