मुंबईत राहणाऱ्या पाचोर्याच्या ‘बंटी-बबली’चा प्रताप
जळगाव (प्रतिनिधी) :- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ‘स्वीय सहायक’ असल्याचे खोटे सांगत एका पती-पत्नीने १८ जणांची तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट आणि इतर अनेक आमिषे दाखवून ही फसवणूक नोव्हेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे., घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हा गुन्हा तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे पोलीस अधीक्षकांकडून वर्ग करण्यात आला आहे.
मूळचे पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (वय-४९) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (वय-४५, दोघे रा. नवी मुंबई) यांनी तरुण-तरुणींना नोकरी आणि वेगवेगळी कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या फसवणुकीसाठी संघवीने स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे भासवले.(केसीएन)त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि बनावट अपॉइंटमेंट लेटरही दाखवले. यामुळे तरुणांचा विश्वास संपादन करून त्याने फसवणूक केली. त्याने रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट, रेल्वे विभागात टेंडर आणि रेल्वे अधिकाऱ्यांसाठी चारचाकी वाहने भाड्याने लावण्याचे आमिष दाखवले. हर्षल शालिग्राम बारी (वय-३२, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) हे आहेत. त्यांच्या दूध डेअरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. हितेशने त्यांची १३ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली.
हर्षल यांच्यासह इतर उर्वरित १७ जणांकडून त्याने एकूण ४२ लाख २२ हजार रुपये घेतले, असे एकूण ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (केसीएन)अनेक दिवस होऊनही नोकरी किंवा काम मिळाले नाही, म्हणून फसवणूक झाल्याचे हर्षल बारी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहून हा गुन्हा तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.