जळगावातील खड्ड्याची समस्या गंभीर
जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा परिरातील गणपती नगरात रस्त्यातील खड्ड्यामुळे रिक्षाचा अपघात झाल्याने रिक्षातील तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. अश्या घटना वारंवार होत असल्याने संतप्त स्थानिक नागरीकांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या गणपती नगरातील नाल्यावरून मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. दरम्यान मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास याच रस्त्यावरील खड्ड्यावरून जात असतांना चालत्या रिक्षाचा एक्सल तुटला. यात अपघात होवून तरूण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. ही घटना घडल्यानंतर बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक नागरीकांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिकेचे अधिकारी मनोज वडनेरे आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हा रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर झालेला आहे. परंतू सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डांबरीकरणाचे काम रखडले आहे. पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने करण्यात येईल असे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली. त्यानंतर नागरीकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.