जळगाव(प्रतिनिधी)- युवकांनी आपले ध्येय निश्चित करावे. “जो खेलेगा वही खिलेगा” त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवा. येत्या काळात नेहरू युवाचे जळगावचे केंद्र देशात सर्वोत्तम ठरेल. यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्वांना आपल्या शालेय जीवनात चांगले व्यासपीठ उपलब्ध होत नाही, त्यामुळे नेहरू युवा केंद्राचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्याचा चांगला फायदा करून घ्या असे आवाहन खा.उन्मेष पाटील यांनी केले.
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज रविवारी दि. १७ रोजी जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवतीर्थ मैदान येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन खा. उन्मेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजपा जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय भूषण लाडवंजारी यांनी तर प्रस्तावना नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी केली. सूत्रसंचालन विकास वाघ याने केले तर विनोद ढगे यांनी आभार मानले.
जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की, आपण निसर्गाशी खेळलो म्हणून आज निसर्ग आपल्याशी खेळतो आहे. अगोदर मनुष्य प्लास्टिक बाहेर फेकायचा. आता मनुष्याला प्लास्टिकमध्ये जाळावे लागत आहे. नेहरू युवा केंद्र व केंद्र सरकार आणि तरुणांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. आपण समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून कार्य करा. प्रत्येकाने रोज शरीरासाठी तासभर वेळ द्यावा. घरी किंवा बाहेर जाऊन व्यायाम करा. ग्रामीण खेळ रांगडी खेळ होते. ते आज लुप्त होत चालले होते परंतु त्यापैकी काही खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जिवंत केले. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे आणि स्वतःला तंदूरूस्त ठेवावे, असे आवाहन आ.भोळे यांनी केले.
गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी सांगितले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण विकास साधला जातो. विनोद ढगे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात एक सामाजिक चळवळ उभारण्याचे काम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक खा.उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा युवा शब्द येतो तेव्हा तो आपला शब्द वाटतो. युवा शब्दाने एक वेगळी प्रेरणा मिळते. एका बाजूला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान घेतांना आपण आव्हान देखील स्वीकारायला हवे. देश खऱ्या अर्थाने जगात पुढे जाणार असेल तर तो युवकांच्या बळावर जाईल. त्यामुळे आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. नेहरू युवा केंद्रासोबत काम करताना आपण स्वतः उत्स्फूर्त असायला हवे. शेकडो तरुणांना नेतृत्त्व, प्रेरणा देणारे आपण विविध संस्थांचे प्रतिनिधी आहोत. आपण आपल्या आणि युवकांच्या विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करा. घरात बसून स्वप्न पूर्ण होत नाही, सहभाग घ्या, ध्येय निश्चित करा. असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यात बुद्धिबळ पट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, नेट, बॅटमिंटन रॅकेट, शटल कॉक यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, हितेश ओसवाल, शिवदास कोचुरे, रणजितसिंग राजपूत, दीपक सपकाळे, प्रशांत बाविस्कर, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.