चोपडा तालुक्यातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पार उमर्टी भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यावर कर्तव्यासाठी गेलेल्या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील लासुर येथील रहिवासी असलेले ५१ वर्षीय कुंदनलाल रघुनाथ बोरसे यांची इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ड्युटी लावण्यात आली आहे. शनिवारी दि. १५ रोजी पार उमर्टी येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्याने तेथे त्यांना कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. (केसीएन)तेथे कारवाईसाठी जात असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रात्रीच लासूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. दि. १६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय बापू साळुंखे करत आहेत.