चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची लासूर रस्त्यावर कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : पुणे येथील दोघा तरुणांना गावठी बनावटीच्या कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे घेऊन तस्करी करताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ अटक केल्याची घटना हातेड-लासुर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोघा संशयितांकडून दुचाकीसह १ लाख ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना चोपडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ३ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील पार उमर्टी येथून गावठी बनावटीचा कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे खरेदी करून पुणे जिल्ह्यात्तील दोन तरुण दुचाकी (क्रमांक एम एच-१२ आर आर-६६६०) ने सत्रासेंन, लासुर हातेडमार्गे चोपडाकडे येत असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हातेड लासुर रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी नाकाबंदी केली.(केसीएन)अंधारात लासुर गावाकडून येणारी दुचाकी क्रमांक (एम एच-१२आरआर-६६६०) आली असता पोलिसांनी दुचाकीस्वारांना अडवून झाडाझडती घेऊन नाव गाव विचारले. नौफील रब्बानी सैय्यद (वय २२, रा.सैय्यद नगर, हडपसर ता. जि. पुणे) व पाठीमागे बसलेला अजय अशोक वाघमारे (वय २४, रा. सलगर ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, ह.मु. नेवाळे वस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे) असे सांगितले. यावेळी दोघांकडून गावठी बनावटीच्या कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे आढळून आले.
दोघांना पोलिसांनी अटक करून बजाज कंपनीची पल्सर दुचाकी, गावठी बनावटी कट्टा व ३ जिवंत काडतुसे असा १,३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या बसबत ग्रामीण पोलिसात दोघां संशयितांविरुध्द आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (केसीएन)सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक, कविता नेरकर, चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोना. शशिकांत पारधी, पोकॉ. किरण पारधी, विशाल पाटील, चेतन महाजन यांनी केली.