या जीवाने अनेकदा उच्च, नीच गोत्रात जन्म घेतलेला आहे. जन्मावरून कुणी उच्च, नीच होत नाही त्याच्या कर्मावरून तो उच्च पदी पोहोचतो. त्याचा व्यर्थ अभिमान बाळगायचा नाही. त्यासाठी एक उदाहरण अवश्य समजून घ्यावे. फुगा हा उंचच उंच जातो तो फुग्यातील भरलेल्या हलक्या वायुमुळे! फुग्याच्या सभोवती असलेल्या गोष्टींमुळे तो उंच जात नाही हे ध्यानात घ्यावे. फुग्याच्या आत असलेल्या वायुमुळे तो उंच जातो. आत्म्याचे देखील तसेच म्हणायला हवे. धन, वैभव या सर्व गोष्टी म्हणजे फुग्याच्या किंवा आत्म्याच्या बाहेर आहेत. आत्मा हा महत्त्वाचा भाग असल्याचे शासनदीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज यांनी प्रवचनात सांगितले.
अहंकार में तीनों गए बल, बुद्धि और वंश, ना मानो तो देख लो कौरव, रावण और कंस… हे उदाहरण देत अहंकार न बाळगण्याचा सल्ला दिला. ‘नाम की चाह अहंकार की पुष्टी करता है।’ सध्या दान धर्म करताना, सामाजिक उपक्रम करत असताना फोटो काढले जातात आणि त्याची खूप प्रसिद्धी मिळविली जाते. खरे तर एका हाताने दान करताना दुसऱ्या हाताला कळू नये असे व्हायला पाहिजे. पूर्वीच्या एका म्हणीची आठवण करण्यात आली ती अशी की, ‘नेकी कर दरिया में डाल’ असे म्हटले जाई परंतु आता या मध्ये फरक झाला आहे, ‘नेकी कर फेसबुक में डाल’ आताची पिढी प्रसिद्धीच्या मागे लागली आहे. प्रसिद्धीच्या मागे जास्त लागू नये कारण त्याने अहंकार वाढतो असा मोलाचा सल्लाही परमपुज्य महाराज साहेब यांनी दिला. प.पु. ऋजुप्रज्ञजी म.सा यांनी देखील ठाणांग सुत्रच्या ८ व्या अध्यायां पर्यंतचा संक्षिप्त गोषवारा सांगितला. यात कपिल मुनी कसे बनले याची रंजक गोष्टही सांगितली.