चाळीसगाव तालुक्यातील साकुर फाटा येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकुर फाट्याजवळ मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उभ्या ट्रॅक्टरला भरधाव दुचाकी आदळल्याने मांदुर्णी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समाधान रावण पाटील (वय-२४) आणि कैलास धनराज पाटील (वय-४०,दोन्ही रा. मांदुर्णी ता.चाळीसगाव) असे मयत झालेल्या दोन्ही तरूणांची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे दोघेजण दुचाकीने तमाशा पाहण्यासाठी गेले होते. गुरूवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तमाशा पाहून दोघेजण घरी परतत असतांना साकुर फाटा येथे रस्त्यावर उसाने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी जोरदार आदळली. त्यामुळे दुचाकीवरील कैलास पाटील आणि धनराज पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून मदत केली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. मृतदेहांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. समाधान पाटील याच्या पश्चात मूलगा, पत्नी, आई, वडील असून तो एकुलता एक होता. तर कैलास पाटील २ मूली, मूलगा असा परिवार आहे.