मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतील ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप के.पी. गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल याने केला आहे.
के.पी.गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना केला आहे. त्याच्या या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
के.पी.गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, ‘मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य उत्तर देईल.’ वेळ आल्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर प्रत्युत्तर देईल, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
प्रभाकर सेलने म्हटले की, तो गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असे त्याने सांगितले. दरम्यान, क्रूझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल माहिती नसल्याचाही दावा त्याने केला आहे. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिल्याचेही म्हटले आहे.