वॊशिंग्टन ( वृत्तसंस्था ) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता ‘फेसबुकनेही २ वर्षांसाठी अकाउंट निलंबित केले आहे. . ‘ट्विटर’ने त्यांचे अकाउंट कायमचे बंद केल्यानंतर ‘फेसबुक’ अकाऊंट दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फेसबुक’चा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा दणकाच मानला जात आहे. ‘फेसबुक’चे व्हाईस प्रेसिडेंट (ग्लोबल अफेयर्स) निक क्लेग यांनी ब्लॉग पोस्टद्वारे ट्रम्प यांना झटका देणाऱ्या या निर्णयाची माहिती सर्वांना दिली आहे.
‘फेसबुक’च्या नव्या निर्णयानुसार डोनाल्ड ट्रम्प आता 7 जानेवारी 2023 पर्यंत आपले ‘फेसबुक’ अकाऊंट वापरू शकणार नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱया मध्यावधी निवडणुकीदरम्यानही ट्रम्प यांना ‘फेसबुक’पासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळेच ट्रम्प या निर्णयामुळे अस्वस्थ झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने अमेरिकन जनतेत संताप आणि दुहीचे वातावरण पसरू नये याचसाठी आम्ही त्यांचे अकाऊंट दोन वर्षे निलंबित ठेवणार आहोत. तज्ञांचे मत घेऊन ट्रम्प यांच्या मेसेजने अशांतता पसरणार नाही याची खातरजमा करून आम्ही त्यांचे ‘फेसबुक’ अकाऊंट पुन्हा सुरू करणार आहोत असे स्पष्टीकरण ‘फेसबुक’ने केले आहे.