चाळीसगाव येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्समधून प्रवास करणार्या प्रवाशाचा महागडा एक लाखांचा लॅपटॉप चोरणार्या चोरट्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी यशस्वी तपासाबाबत तपासाधिकाऱ्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.
योगेश शामलाल पाटील (२७, जुनेगाव, कजगाव, ता.भडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हर्ष प्रवीण पाटील (वय २०, रा. कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर) हे पुणे येथून सरस्वती ट्रॅव्हलने दोन दिवसांपूर्वी कन्नड येथे जात होते. प्रवासादरम्यान ट्रॅव्हल सिग्नल चौक, चाळीसगाव येथे पहाटे सहा वाजता थांबली असताना त्यांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली होती.
चाळीसागव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक पाटील, अमोल भोसले यांना चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स परीसरात एक संशयित हा महागडा लॅपटॉप विक्रीसाठी घेवून आल्याचे कळले. पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार योगेश बेलदार, हवालदार नितीन वाल्हे, दीपक पाटील, तुकाराम चव्हाण, अमोल भोसले, गणेश कुंवर, निलेश पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव, नंदकिशोर महाजन, विनोद खैरनार, मोहन सूर्यवंशी यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
योगेश शामलाल पाटील या संशयिताकडून चोरी केलला लॅपटॉप जप्त करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक पाटील व अमोल भोसले करीत आहेत.