संतप्त जमावाने केली बसची तोडफोड ; परिस्थिती नियंत्रणात
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचा पाच वर्षीय भाऊ जखमी झाला आहे. यावेळी संतप्त जमावाने ट्रॅव्हल बसची तोडफोड केली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. बालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात बुलढाणा येथील धामणगाव बढे येथून जामनेर येथे प्रवासी घेऊन बालाजी ट्रॅव्हल्स (एम एच २१ बीएच ०६४७) ही शनिवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निघाली होती. बस देऊळगाव बस स्थानकाजवळ आली असताना दोन लहान सकखे भाऊ रेहान नशीब तडवी (वय ५ वर्ष) आणि आर्यन नसीब तडवी (वय ३ वर्ष) यांना जबर धडक दिली.
जखमी बालकांना आजूबाजूच्या नागरिकांनी बुलढाणा येथे उपचारार्थ हलविले. त्यामध्ये ३ वर्षीय आर्यन याचा मृत्यू झाला तर ५ वर्षीय रेहान गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड संताप झाला होता. त्यांनी ट्रॅव्हल्स वाहनाची तोडफोड केली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली.
देऊळगाव येथील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील प्रयत्न केले. दरम्यान दुर्घटनेतील ट्रॅव्हल्सचे वाहन चालक आणि वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत. चिमुकल्या आर्यन याच्या मृत्यूमुळे कष्टकरी तडवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.