अमळनेर तालुक्यात कळमसरे येथे केली होती चोरी
अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील कळमसरे येथे अज्ञात चोरट्याने रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मारवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
कळमसरे गावात रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कळमसरे येथे घडली होती. या प्रकरणी मारवड पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी तुषार शालिग्राम कोळी (वय २८, रा. म्हळसर ता. शिंदखेडा) याला अटक केली आहे. कळमसरे येथील शेतकरी हेमंत काशिनाथ चौधरी यांचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हे रोटाव्हेटरसह गावातील रवींद्र कोळी यांच्या घरासमोर दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी लावले होते. दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सदर ट्रॅक्टर लावलेल्या जागी दिसून आले नाही म्हणून परिसरात शोध घेतला असता ते मिळून आले नाही. सदर ट्रॅक्टर चोरी झाल्याची खात्री झाल्याने हेमंत चौधरी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरुन नेल्याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी सपोनि शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोना सुनील तेली यांनी तपास केला. संशयित आरोपी शिरपूर येथे ट्रॅक्टर विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोना सुनील तेली, पोकॉ उज्वल पाटील, हेकॉ सचिन निकम यांच्या पथकाने शिरपूर येथे संशयित आरोपीस ताब्यात घेतले. ट्रॅक्टरही ताब्यात घेतले आहे.