जळगाव शहरात खेडी रोडवर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरापासून जवळ असलेल्या खेडी फाट्याजवळ भुसावळकडून जळगावकडे येणारा एका दुचाकीस्वराला अज्ञात ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेश कॉलनी, भुसावळ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. महेंद्र बोंडे हा तरुण आई-वडील यांच्यासह राहत होता. तो जळगाव येथील एमआयडीसीतील गणेश अल्युमिनियम कंपनीमध्ये कामाला होता.(केसीएन)दररोज भुसावळ ते जळगाव असा दुचाकीने अपडाऊन करत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी २९ मार्च रोजी सकाळी महेंद्र हा दुचाकीने भुसावळकडून जळगावला येण्यासाठी निघाला. जळगाव खेडी फाट्याजवळ अज्ञात ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो रोडवर पडला आणि त्याला ट्रकने चिरडले. त्यात महेंद्र बोंडे हे जागीच ठार झाले.
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.