मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे ट्रॅक्टरवरून पडून गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
आकाश उत्तम गावडे (वय १७, रा. खामखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो खामखेडा येथे आई, भाऊ, २ विवाहित बहिणी यांच्यासह राहत होता. त्याचे वडील मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. (केसीएन)दरम्यान, सोमवारी दि. २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता एका तरुणासह ट्रॅक्टरवरून खामखेडा गावात येत असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये काहीतरी बिघाड जाणवला. त्यात ट्रॅक्टर पलटी होणार अशी स्थिती असताना आकाश गावडे हा खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला ट्रॅक्टर चालक व ग्रामस्थांनी रुग्णालयात हलविले.
तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले.(केसीएन)याठिकाणी डॉक्टरांकडून उपचार सुरु असताना आकाश गावडे याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, या घटनेने खामखेडा गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.