चोपडा तालुक्यात सनपुले रस्त्यावर भीषण घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चोपडा-सनपुले रस्त्यावर दि. १० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार इसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेले तरुण जखमी झाले आहेत.याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिदास जुलाल पाटील (वय ४६, रा. सनपुले) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तर हंसराज मोहन पाटील (वय २५, रा. सनपुले) हे जखमी झाले आहेत. दोघेही सकाळी पिण्याच्या पाण्याचे कुप्पे घेऊन दुचाकी क्रमांक (एमएच २०, डीओ ७५६४) वरून कुरवेलकडे जात होते. त्या दरम्यान चोपड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र. आरजे ११ जीए ९२११) या धडकेत मोटारसायकल चालक रोहिदास पाटील हे ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हंसराज पाटील हे दूर फेकले गेल्याने जखमी झाले.
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील अनिल साहेबराव पाटील, आप्पा सुरेश पाटील, विवेक ज्ञानेश्वर पाटील, ललित मोहन पाटील, भूषण भास्कर पाटील आदी ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी हंसराज पाटील यांना तसेच मयत रोहिदास पाटील यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. फिर्यादी हंसराज पाटील यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.