जळगाव एमआयडीसी पोलिसांचा यशस्वी तपास
जळगाव (प्रतिनिधी) – मुलीशी का बोलतो याचा राग मनात धरून तरुण ट्रकचालकाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून ठार करणाऱ्या पित्यासह दोघांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासांत संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सागर रमेश पालवे (२४, रा. मालदाभाडी,ता. जामनेर) या तरुणाचा शुक्रवारी ८ रोजी खून झाला होता. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर), नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीआहे. मयताची आई नीलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितांची एमआयडीसी पोलिसांनी माहिती काढून ज्ञानेश्वरला मुक्ताईनगर येथून तर नीलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांना अटक करण्यात येऊन न्या. जान्हवी केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, किरण पाटील, सुधीर साळवे, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी, संदीप बि-हाडे यांनी केली.