जळगाव ( प्रतिनिधी )- शहरातील शिवकॉलनी स्टॉप ते मानराज पुलाच्या दरम्यान जळगाव – धुळे महामार्गावर अचानक ट्रॅकला आग लागल्याची घटना रविवारी रात्री ८ . ४५ वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या ३ अग्निशमन बम्बांनी ही आग आटोक्यात आणली.
या घटनेत ट्रकमधील रिकामी पोती (बारदान) जळून खाक झाले असून ट्रकचे ( क्र – एम एच ०४ – जी सी -७८१२ ) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चालक व क्लिनर बालंबाल बचावले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगिवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. या ट्रकचे टायर अचानक फुटल्याने ठिणग्या उडाल्या आणि आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता
अग्निशमन दलाचे नासिर अली शौकत अली, राजमल पाटील, निवांत इंगळे, मोहन भाकरे, प्रकाश चव्हाण, राजेश चौधरी, पन्नालाल सोनवणे, सोपान जाधव, इसुब पटेल, संतोष पाटील यांनी ही आग आटोक्यात आणली . ट्रक धुळ्याहून जळगावकडे येत होती आणि बारदान जळगांव ला खाली करणार होते. जालना जिल्ह्यातील मंठा येथील विलास बबनराव सुरडकर असे या ट्रकचालकाचे नाव असलयाचे सांगण्यात आले .
गुरुवारी शहरातील भुसावळ रोडवर धावत्या कारला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रविवारी दुपारी देखील बांभोरी जवळ महार्गांवर एका चालत्या कारला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेला काही तास लोटत नाही तोच शिव कॉलनी ते मानराज पुलामध्ये महामार्गावर चालत्या ट्रकला आग लागली. तीन दिवसात तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.