भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील घटना

भडगाव (प्रतिनिधी) – येथे पाचोऱ्याकडून – भडगावकडे जात असतांना ग्रामीण रुग्णालयाजवळील वळणावर ट्रक – दुचाकींचा अपघात होऊन कन्नड तालुक्यातील आवराड येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. २४ रोजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पाचोऱ्याकडून – भडगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी (एम.एच. १९ सी. बी. ६३७४) वरील चालक राहुल दिलीप वाघ (वय-२५ वर्ष) हा भडगाव ग्रामीण रुग्णालयाजवळील वळणावर भडगाव कडून पाचोऱ्याकडे जाणा-या ट्रक क्र. टी.एस. ०२ यु.ए. ६६७८ जात आसतांना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. घटनेत तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या संदर्भात मयत झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे.

घटनास्थळावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यावेळी भडगावचे पोलीस नाईक लक्ष्मण पाटील व पोकॉ. ईश्वर पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तरुणांच्या जवळ असलेल्या बॅगमध्ये सापडलेल्या आधारकार्डवरून त्याची ओळख प्राथमिक स्वरूपात पटली आहे. घटनेत त्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत.







