पारोळा तालुक्यात मेहु टेहू गावाजवळील घटना
पारोळा (प्रतिनिधी): पारोळा-कजगाव रस्त्यावर मेहु टेहू गावाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय रमेश जाधव (वय ४५, मूळ रा. चिखली, जि. बुलढाणा, ह.मु. तांबे नगर, पारोळा) हे सोमवारी दि. दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने पारोळाकडून कजगावच्या दिशेने जात होते. यावेळी कजगावकडून पारोळाकडे येणाऱ्या एका निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरने (ज्याला नंबर प्लेट नव्हती) दत्तात्रय जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
संजय सुपडू पाटील यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवून ही धडक दिली. या भीषण धडकेत दत्तात्रय जाधव यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक मदतीसाठी न थांबता किंवा पोलिसांना माहिती न देता ट्रॅक्टर सोडून पळून गेला. याप्रकरणी मयताचे मित्र चेतन दिगंबर पाटील (वय ३४, पशूधन पर्यवेक्षक, रा. बुलढाणा, ह.मु. पारोळा) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या चेसीस नंबरवरून अज्ञात चालकाचा शोध सुरू केला आहे.
पारोळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहे/ हितेश चिंचोरे करीत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात आहे. मयत दत्तात्रय जाधव हे बुलढाणा जिल्ह्यातील असून कामाच्या निमित्ताने पारोळा येथे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.









