भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळ गिरणा नदीपात्रात घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूचे भरलेले ट्रॅक्टर चालवत असताना अचानक मोठे टायर फुटले यावेळी चालकाने खाली उडी मारली. परंतु ट्रॅक्टरच्या खाली तो दाबला गेल्याची घटना दिनांक १७ रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करत असताना शनिवारी पहाटे वाक गावाजवळील वडाच्या झाडाजवळ ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टरचे मोठे टायर अचानक फुटले. दरम्यान चालक रामदास सुभाष सोनवणे (वय ३५,रा. पेठ भडगाव) याने ट्रॅक्टर वरून खाली उडी मारली. परंतु ट्रॅक्टर त्याच्या अंगावर पलटी झाले.घटना घडताच रामदास सोनवणे याला भडगाव ग्रामीण रुग्णालयाला दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मुंडे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. भडगाव पोलीस स्टेशनला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.