शहरात पुन्हा तरुणाचा बळी : राजस्थानच्या डंपरने जळगावात केला भीषण अपघात, चालकाला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव डंपरचे नियंत्रण सुटल्याने पुढे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॉली पूर्ण गोल फिरून गेली. यात ट्रॉलीवर असणाऱ्या ४ कामगारांपैकी एकाचा डंपर खाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी डंपर चालकावर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकास अटक करण्यात आली असून डंपर जप्त करण्यात आला आहे. हि भीषण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पहा जोरदार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज
ट्रॅक्टर वरील चालक विजय मधुकर कुंभार (वय २८, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा हुडको, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर पूनमचंद कुंभार (रा. कानळदा रोड, जळगाव) यांच्याकडे २ वर्षांपासून तो चालक म्हणून काम करीत आहे. ज्ञानेश्वर कुंभार हे विटभट्टीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे फिर्यादी हा ऑर्डर प्रमाणे वीट वाहतुकीचे काम करतो.(केसीएन) फिर्यादी विजय कुंभार यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक (एम एच १९ एएन २९०६) व ट्रॉली क्रमांक एमएच १९ एएन ५८१४) मध्ये शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता डिकसाई फाटा, जळगाव येथे सदर ट्रॅक्टरवर ट्रॉलीमध्ये विटा भरण्यात आल्या होत्या. ही विटांची खेप पोहोचवण्यासाठी फिर्यादी विजय कुंभार हे पिंप्राळा येथील दत्त मंदिर जवळ जाण्यासाठी निघाले. ट्रॉलीमध्ये विटा चढ-उतार करण्यासाठी मजूर सुनील मधुकर भिल, अंकुश आत्माराम भिल (दोन्ही रा. डिकसाई ता. जळगाव) तर मानसिंग उर्फ शुभम सुका भिल आणि गणेश भगीरथ भिल हे देखील बसलेले होते.
डिकसाई फाट्यावरून ममुराबाद-शिवाजीनगर-गेंदालाल मिल मार्गे सुरत रेल्वे गेटकडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजीनगर परिसरातील मिथिला सोसायटीच्या जवळ पेट्रोल पंपासमोर अचानक पाठीमागून आलेल्या डंपरने क्रमांक (आरजे ४४ जीए ३९६७) ने त्याच्या समोरील बाजूने ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली.(केसीएन) या धडकेत ट्रॉली पूर्ण गोल फिरली तर ट्रॉली वरून खाली पडलेला कामगार अंकुश आत्माराम भिल याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच मयत झाला. त्यानंतर डंपर डिव्हायडरला ठोकून रोडच्या मध्ये असलेल्या विद्युत पोलला धडकला. नंतर रेल्वे गेट कडून येणाऱ्या विरुद्ध रस्त्यावर दोनशे फुटावर जाऊन कसा तरी थांबला.
या अपघातात ट्रॉलीत बसलेले कामगार सुनील भिल याच्या डोक्याला दुखापत झाली. मानसिंग उर्फ शुभम भिल याच्या पायाला मुका मार बसला. तर गणेश भिल याच्या हाताला व पायाला मुका मार लागल्याने दुखापती झाल्या. अपघातातील ट्रकचालक याला नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. चौकशीत डंपर चालकाने त्याचे नाव चंदालाल हनुमान गुर्जर (वय ४०, रा. गाव बागपुरा, पोस्ट फुलेरा पोलीस ठाणे नरेना जि. रायपुर राजस्थान) असे सांगितले.(केसीएन) सदर चालकाने हा डंपर घेऊन पोखरी ते जळगाव बायपास जात असल्याचे सांगितले. त्यामुळे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून डंपर आणि त्यावरील चालक दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर अपघातात मजूर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे तीन मुले पोरकी झाली आहेत. डिकसाई गावावर शोककळा पसरली आहे.
व्हॅनचालक, ५ शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले
सदर घटनेत मिथिला सोसायटी येथील सीसीटीव्हीत घटना कैद झाली आहे. या घटनेत घटनास्थळाजवळ एका बाजूला उभी असणारी शालेय व्हॅनला या डंपर व ट्रॅक्टरची धडक लागताना थोडक्यात वाचली आहे. या शालेय व्हॅनमध्ये चालक व ५ शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी बसलेले होते. जर डंपरने दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरची धडक व्हॅनला लागली असती तर चालकासह विद्यार्थ्यांनादेखील गंभीर दुखापती होण्याची शक्यता होती. तसेच, थोडक्यात मोठी दुर्घटना होण्यापासून राहिली आहे. भरधाव जाणाऱ्या डम्परला आता जिल्हा प्रशासन आवर घालेल काय ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.