पित्यापाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने पिंपळे गावात शोककळा
जळगाव( प्रतिनिधी) – जळगाव शहरात भरधाव आयशरने कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ एका पायी जाणाऱ्या तरुणाला उडवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान बुधवारी रात्री ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली, त्याला काही तास उलटत नाहीत तोच ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अजय सिताराम कोळी (वय २६ रा. पिंपळे खुर्द ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. (केसीएन)शहरातील अजिंठा चौकात बुधवारी १८ डिसेंबर रोजी रात्री एका भरधाव ट्रकने चिरल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना गुरुवारी दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या एका भरधाव आयशरने पायी जाणाऱ्या अजय कोळी याला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली. नातेवाईकांनी रुग्णालयात येताच मन हेलावणारा आक्रोश केला. अजय कोळी याचे वडिलांचे नुकतेच दिनांक २ डिसेंबर रोजी गंभीर आजाराने मृत्यू झाल्यामुळे घरात शोकाचे वातावरण असतानाच आता पित्यापाठोपाठ मुलाचा मृत्यू झाल्यामुळे पिंपळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.