जळगाव ( प्रतिनिधी ) – ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी रात्री नशिराबाद येथून अटक केली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम मुकेश करोसिया (वय-२१ , रा. भवानी नगर नशिराबाद ) आणि राजेंद्र सुकलाल भोई (वय-२० , रा. निमजाई माता मंदीर नगर नशिराबाद ) अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.
सोनाजी अशोक मिरगे (वय-३० , रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद ) ट्रकचालक आहेत . सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४६- एफ – ५३४५ )वर काम करतात. ५ जूनरोजी रात्री सोनाजी मिरगे चिंचोली येथील गोडावूनमधून माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात असतांना उमाळा घाटात रात्री चार जण दुचाकीवरून येवून ट्रकच्या समोर उभी राहिले होते . त्यानी ट्रक थांबविला. चाकू दाखवल्यावर आपल्याकडे पैसे नसल्याचे मिरगे यांनी सांगितले. या चोरांनी मिरगे यांच्या खिशातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून चौघे एकाच दुचाकीने पसार झाले. या ट्रकचालकांने दुचाकीचा क्रमांक (एमएच १९ डीए १२८३) असल्याचे लक्षात ठेवले. ट्रकचालक सोनाजी मिरगे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुचाकीच्या क्रमांकावरून दोन संशयित आरोपी हे नशिबराद येथील असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी राम करोसिया आणि राजेंद्र भोई यांना गुरूवारी रात्री राहत्या घरातून अटक केली इतर दोघांचा शोध सुरू आहे.