चाळीसगाव शहरातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरात लूटमार सुरू असल्याचे सांगत, सुरक्षिततेचा बहाणा करून तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी एका वृद्धाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बंजारा कॉलनी परिसरातील रहिवासी पांडुरंग त्र्यंबक दुसाणे (वय ८२), जे एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, ४ मार्च रोजी सकाळी ११:५५ च्या सुमारास आपल्या स्कूटीने कुलरचा पत्रा दुरुस्तीसाठी घाट रोडकडे जात होते. रेल्वे उड्डाण पुलावरून उतरून कोर्टासमोर आले असता, एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग केला.
दुचाकीवरून आलेल्या त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्याने स्वतःला ‘सरकारी कर्मचारी’ असल्याचे सांगून दुसाणे यांना थांबवले. “शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर लूटमार सुरू आहे, तुम्ही अंगावरील सोने काढून ठेवा,” असा सल्ला त्या भामट्याने दिला. दुसाणे यांनी विश्वासाने आपल्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढल्या. त्या व्यक्तीने अंगठ्या रुमालात गुंडाळून त्यांना परत केल्याचा भास निर्माण केला. मात्र, काही क्षणातच तो भामटा आपल्या साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला.
काही वेळाने दुसाणे यांनी तो रुमाल उघडून पाहिला असता, त्यात अंगठ्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भामट्यांनी हातचलाखी करून सुमारे १४ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या होत्या. या फसवणुकीनंतर पांडुरंग दुसाणे यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. चाळीसगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.









