जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात तोतया पोलिसांनी वृद्धेला फसवून हातातील पन्नास हजारांच्या सोन्याच्या बांगड्या भामट्याने लांबविल्याची घटना उघड झाली आहे. जिल्हा पेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गणेशनगर, चिनार अपार्टमेंट येथे पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (वय ७५) या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट असे पायी जात असताना दोन पंचवीस ते तीस वर्षीय भामट्यांनी त्यांना गाठले. आजीला बोलण्यात गुंतवून हातातील बांगड्या काढून घेतल्या. घरी आल्यावर बांगड्या कुठे गेल्या म्हणून त्या शोधू लागल्या. अखेर त्यांना आठवल्यावर कुटुंबीयांसह पुष्पाबाई यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला हवालदार वंदना राठोड तपास करीत आहेत.