काशी एक्प्रेसमध्ये विनापरवाना तपासणी करताना आढळला
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ रेल्वे विभाकडून विशेष पथक दामिनीकडून तोतया तिकीट निरीक्षकाला अटक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मुंबईकडे जात असलेल्या काशी एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते मनमाड दरम्यान शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी दामिनी पथकाकडून नियमित तपासणी केली जात होती. या तपासणीत हा तोतया तिकीट निरीक्षक हा चक्क प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करतांना आढळून आला होता.
त्याला दामिनी पथकाने मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या सुपूर्द केले. भुसावळ रेल्वे विभागात अंतर्गंत असलेले दामिनी पथक शुक्रवारी नियमित तपासणी करीत होते. या पथकाला काशी एक्सप्रेसमध्ये एक संशयित व्यक्ती प्रवाशांचे तिकट तपासात होता. त्याने यावेळी रेल्वेचा गणवेश परिधान केला होता. दामिनी पथकाला त्याचा संशय आला. पथकाने त्याची अधिक चौकशी केली. मात्र, तो चौकशीत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्याकडे रेल्वे संदर्भातील कोणतेही वैध ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. यावेळी दामिनी पथकाने तोतया तिकीट तपासणिकास ताब्यात घेतले. त्यास मनमाड स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल त्याच्यावर पुढील कारवाई करत आहे.