घराच्या पोर्चमधून १२ कट्टे लंपास
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील तोरनाळा येथे एका शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या पोर्चमधून अज्ञात चोरट्यांनी ५८,८०० रुपये किमतीची तूर चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू धुमसिंग पाटील (वय ४८, रा. तोरणोळा, ता. जामनेर) यांनी आपल्या शेतातील तूर काढणीनंतर १२ कट्टे घराच्या पोर्चमध्ये ठेवले होते. दिनांक २ फेब्रुवारीच्या रात्री ९:३० ते ३ फेब्रुवारीच्या सकाळी ६:३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हे १२ कट्टे लंपास केले. प्रत्येकी ७० किलो, एकूण वजन ८ क्विंटल ४० किलो, एकूण किंमत: ५८,८०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
विष्णू पाटील यांनी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करत आहेत.









