वनविभागाची तत्परता व पशू वैद्यकाचे तात्काळ उपचार
जामनेर ( प्रतिनिधी ) – येथील तरूणांच्या सतर्कतेमुळे आज एका अत्यवस्थ माकडीणीचे प्राण वाचवण्यात वनविभागाला यश आले .
तोंडापुर परिसर अजिंठ्याच्या डोंगराला लागून असून इथे मानवी वस्तीच्या आसपास व शिवारात विविध वन्यजीवांचा मुक्त वावर असतो. वन्यजीव विविध कारणांमुळे जखमी वा आजारी पडण्याच्या घटना येथे नेहमीच घडतात. या अगोदर या परिसरात उदबिल्ला जखमी होता त्यासही तेथील तरूणांच्या सतर्कतेने वाचवण्यात जामनेर वनविभागाला यश आले होते.
तोंडापुर बस स्टॉप जवळ एका घरावर एक वानरिन पिलाला जन्म दिल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असल्याचे गावातील सर्पमित्र व निसर्ग सेवक भूषण कानडजे , राकेश देवकर इ इतर तरूणांनी पाहीले त्यांनी या वन्यजीवास त्वरीत पाणी व अन्न देत सावलीत ठेवून माणूसकीचे दर्शन घडविले .या तरूणांनी सिल्लोडचे वन्यजीव अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांना सांगितले त्यांनी जळगावचे डी. एफ .ओ. होशिंगे यांना व जामनेर वन विभागाच्या अमोल पंडित याना त्वरीत सुचित करून सूत्र वेगाने हलली सोबत पशु वैद्यकिय चिकित्सक डॉ.व्यवहारे यांना पाठविले घटनास्थळी या वन्यजीवावर सलाईन व इतर औषधांचा वापर करून या प्राण्याचे प्राण वाचवले. पुढील उपचारासाठी त्यास जामनेर येथे वनविभागाच्या विशेष वाहनाने नेण्यात आले.
यावेळी पी. व्ही. महाजन , शब्बीर पिंजारी व इतर वन कर्मचारी हजर होते. जैवविविधता टिकून राहण्यासाठी प्रत्येक वन्यजीव महत्त्वाचा असून कुठेही वन्यजीव संकटात असल्यास 1926 या वनविभागाच्या टोल फ्रि क्रमांकावर किंवा व्यक्तीगत संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे.