दिवसा वीजवापरावर ग्राहकांना दिलासा; महावितरणचा अभिनव उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर बसवलेल्या घरगुती वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसा, म्हणजे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान वापरलेल्या विजेवर सवलत लागू झाली असून, जळगाव परिमंडलातील तब्बल १ लाख ६६ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ९५ लाख रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.
मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी सांगितले की, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक घरगुती ग्राहकाने टीओडी मीटर बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांनी महावितरण व संबंधित एजन्सींना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दिवसा विजेवर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने १ जुलैपासून लागू असलेल्या नव्या दरपत्रकानुसार, घरगुती ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ मिळविणारे ग्राहक आता आपली वीजबचत थेट मोबाईलवर पाहू शकतात.
चार महिन्यांचा सवलतीचा आकडा -जळगाव मंडल: ९५,७८५ ग्राहकांना ₹५३.९४ लाख सवलत, धुळे मंडल: ४२,४४८ ग्राहकांना ₹२२.५७ लाख सवलत, नंदुरबार मंडल: २८,४६४ ग्राहकांना ₹१८.२९ लाख सवलत, एकूण: ₹९४.८० लाखांची सवलत.
आधुनिक मीटरचे वैशिष्ट्य – हे टीओडी मीटर पूर्णतः ऑटोमॅटिक आणि अचूक रीडिंग देणारे असून, वीजबिलांमध्ये मानवी चुका होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे., मीटर मोफत बसवले जात आहेत, ग्राहकांना कोणताही आर्थिक भार नाही., हे पोस्टपेड मीटर असून, पूर्वीप्रमाणेच वापरानंतर बिल दिले जाईल., वीज वापर दर तासाला मोबाईलवर पाहता येतो, त्यामुळे ग्राहक स्वतःच्या वापरावर नियंत्रण ठेवू शकतो.
ग्राहकांसाठी फायदेशीर तंत्रज्ञान – सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत घरगुती उपकरणांचा वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या कालावधीत कमी दरात वीज मिळाल्याने ग्राहकांचा दरमहा लक्षणीय आर्थिक बचत होत आहे.
महावितरणचा संदेश – मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी सांगितले की, “टीओडी मीटरमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर वीजबिल मिळते. सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व सहकार्य करावे.”









