अर्ध्या तासात तीन ठिकाणी हातचलाखीने चोरी; सीसीटीव्हीत आरोपी महिला कैद
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुवर्णपेढ्यांना लक्ष्य करणाऱ्या एका अज्ञात *‘लेडी स्नॅचर’*ने केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत तीन नामांकित दागिन्यांच्या दुकानांना गंडा घालून तब्बल साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनांमुळे सुवर्ण व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी महिलेसाठी विशेष पथक तयार करून तीव्र शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सुभाष चौकातील आर.सी. बाफना ज्वेलर्स येथे हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली एक महिला अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आली. अंगठ्या दाखविताना तिने सेल्समनचे लक्ष विचलीत करून १ लाख ८५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरल्या आणि त्याऐवजी नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या. हा प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला आहे.
यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तीच महिला भंगाळे गोल्ड ज्वेलर्समध्ये गेली आणि त्याच युक्तीने १ लाख ४५ हजार रुपयांची अंगठी लंपास केली. दरम्यान, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सहा ते सात या वेळेत तिने आणखी एका सुवर्णपेढीत १ लाख ४० हजार रुपये किमतीची अंगठी हातचलाखीने चोरून नेली.
तिन्ही ठिकाणांहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाच महिलेचा सहभाग स्पष्ट दिसत असून, तिच्या हालचालींचे ठसे व चेहऱ्याचे स्पष्ट दृश्य पोलिसांनी हाती घेतले आहेत. या *‘लेडी स्नॅचर’*चा मागोवा घेण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोहेकॉम प्रदीप नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु असून, इतर पोलिस ठाण्यांनाही सतर्क करण्यात आले आहे.









