जळगावातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्याचे काम सुरु
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी मोबाईल चोरीच्या ३ घटना घडल्या असून चोरीला गेलेल्या तिन्ही मोबाईलची एकत्रित किंमत ५० हजार रुपयांच्या जवळपास आहे . विशेष म्हणजे २ भामट्यांनीच या वेगवेगळ्या ठिकाणी ३ मोबाइलला हिसकावून पळ काढला आहे
मोबाइल चोरीच्या पहिल्या घटनेत सिंधी कॉलोनीतील बाबानगरातील रहिवाशी गायत्री आडवाणी ह्या आकाशवाणीजवळच्या संवेदना हॉस्पिटलजवळून जात असताना २५ ते ३० वर्षे वयाच्या व काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलीवरून आलेल्या या २ अज्ञात तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला .
दुसऱ्या घटनेत गणेश कॉलोनीतील साईबाबा मंदिराजवळच्या फिरोज शहा यांच्या ए टू झेड मोबाईल शॉप या दुकानात मोबाईल कव्हर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या या २ अज्ञात तरुणांनी हितेश प्रशांत बऱ्हाटे ( वय १८ , मुक्ताईनगर , बजरंग बोगद्याजवळ ) या ग्राहकाचा मोबाइल हिसकावून धूम ठोकली .
तिसऱ्या घटनेत रिंग रोड भागातील ९० डिग्री स्पॉट जवळ एका अल्पवयीन मुलाच्या हातातूनही या २ अज्ञात तरुणांनी मोबाईल हिसकावून पळ काढला आहे . या तिन्ही चोऱ्या करणारे आरोपी वेगवेगळे नसून हेच २ भामटे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे . यापैकी एकाने पांढर शर्ट आणि जीन्स पॅन्ट आणि दुसर्याने टी शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेली असल्याचे वर्णन तक्रारदारांनी पोलिसांकडे केले आहे . तपास पो नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.