भुसावळात रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ रेल्वे स्थानकावर एका जणाला तिकिटाचा काळाबाजार करताना रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे स्लीपर तिकीट आढळून आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवामुळे रेल्वे गाड्यांना गर्दी वाढली आहे, या गर्दीचा फायदा घेत अनेक जण तिकीटांचा काळाबाजार करीत आहेत. या पार्श्वभुमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी विभागातील सर्वच रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकांना तिकीटांचा काळा बाजार करणार्यांविरूध्द धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ स्थानक निरीक्षक पी.आर.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ स्थानकाच्या उत्तर बाजूस असलेल्या तिकीट कार्यालयात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संयुक्त कारवाईदरम्यान रेल्वे सुरक्षा बल, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी एक व्यक्तीला अवैध रेल्वे तिकिटांच्या व्यवहारप्रकरणी ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेचे एएसआय शिवानंद गीते, विलास बोरोले, प्रधान आरक्षक नीलेश अढवाल व आरक्षक अनुज कुमार यांच्या पथकाने केलेल्या छाप्यात हाशीम खान (वय २४, रा.राजा नगर, भुसावळ, जि.जळगाव) याच्याकडून एक स्लीपर तिकिट जप्त करण्यात आले. त्याने तिकिटासंदर्भात समाधानकारक माहिती दिली नाही. भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून काढलेले तिकीट हे सचखंड एक्स्प्रेसचे होते. छत्रपती संभाजी नगर ते नवी दिल्ली असे स्लीपर कोचचे तिकीट होते. यात सीट नंबर ४४ व ४५ होते. तिकीटाची किंमत १ हजार २९० रूपये होती. अवैध तिकीट पकडल्यावर घटनेचा दुबे यांनी पंचासमक्ष पंचनामा करून तिकिट जप्त केले. संशयीताची चौकशी केली असता त्याने चौकशीत रेल्वे तिकिटांच्या अवैध व्यापार करीत असल्याचे कबूल केले. यावेळी संशयीताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुदामा यादव करीत आहे.